औरंगाबाद- पैठण रोड हा कितीही दर्जेदार झाला तरी वाहनांच्या भरधाव वेगामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पैठण रोडवरील मॉ-बाप दर्गाह जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला. हा भिषण अपघात सोमवारी (दि.१९) घडला. दरम्यान, ट्रकच्या धडकेनंतर डोक्यावरील हेल्मेट बाजूला पडल्यावर ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे शिक्षकाचा मृत्यू झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, संतोष लक्ष्मण गायकवाड (वय ३९, रा.नाथपुरम, इटखेडा, पैठण रोड) असे
अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. संतोष गायकवाड हे गेल्या १० वर्षापासून
पैठण रोडवरील अग्रसेन विद्या मंदीर येथे डांन्स (नृत्य) शिक्षक म्हणून कार्यरत
होते. दिवाळी सणाच्या सुट्या संपल्यावर सोमवारपासून शाळा सुरू झाल्याने ते शाळेत
आले होते. दिवसभर शाळेतील कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास
गायकवाड हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २० ई १८९३ ने इटखेडा येथील घराकडे जात
होते. पैठण रोडवरील मॉ-बाप दर्गाहजवळून ते वळण घेत असतांना समोरून भरधाव वेगाने
आलेल्या आयशर ट्रक क्रमांक एमएच २५ बी ६०२४ ने गायकवाड यांच्या दुचाकीस जोराची धडक
दिली. ही धडक इतकी भिषण होती की, धडकेनंतर गायकवाड यांच्या डोक्यावरील हेल्मेट निघुन बाजूला
पडले होते. त्याचवेळी आयशरचे समोरील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने गायकवाड हे
रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गायकवाड यांचा अपघात झाल्याचे पाहुन त्यांच्या
सहकारी शिक्षकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच
वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या टु-मोबाईल व्हॅनवरील जमादार बबन शिंदे, मोहम्मद मुसा शेख, घटनास्थळी धाव
घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गायकवाड यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले.
घाटीतील डॉक्टरांनी गायकवाड यांना तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी (ता.१९) उशिरापर्यंत
सातारा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.















